मी मोर्चा नेला नाही ही संदीप खरे यांची आठ वर्षे जुनी कविता. हि कविता बुद्धिजीवी माणसाच्या मनातील भाव दर्शवते. बुद्धीजीवी मनुष्य म्हणजे असा मनुष्य की जो त्याचा बुद्धीचा वापर फक्त स्वतःची जीविका चालवण्यासाठी करतो. अशा लोकांना समाजात कुठे काय घडत आहे आणी काय नाही याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. दुर्दैवाने भारतात अशा लोकांची संख्या जास्त आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना वाटतं शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. हे लोक मुकाट्याने सगळे सहन करत असतात. कुठल्याही वादविवादात पडत नाही. संघर्ष करून काही गोष्टी मिळवणे यांना माहीतच नसतात. यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच बघायला मिळते. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असून देखील आजही हे लोक शांतच आणि शांतच राहतील. चला तर मग बघुया संदीप खरे यांची मी मोर्चा नेला नाही.
मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही
भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही
नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही
धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही
मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही
मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Ask your question here